'किस देश मे है मेरा दिल' ते 'छिछोरे' पर्यंतचा प्रवास
'किस देश मे है मेरा दिल' ते 'छिछोरे' पर्यंतचा प्रवास :
२००८ मध्ये स्टार प्लस चॅनलवर लागणाऱ्या एका 'किस देश मे है मेरा दिल' नावाच्या एका मालिकेत आपण साईड ऍक्टरच्या भूमिकेत एका तरुण मुलाला पाहतो. त्यानंतर तोच मुलगा झी टीव्ही वर लागणाऱ्या 'पवित्र रिश्ता' नावाच्या एका प्रसिद्ध मालिकेत लीड ऍक्टर ची भूमिका साकारताना दिसतो. २००९ ते २०११ पर्यंत चाललेल्या ह्या सुप्रसिद्ध मालिकेतील ह्या मुलाचं काम पाहून आपल्याला तो आवडायला लागतो. मालिका संपल्यावर आपल्याला त्या मुलाचा विसर पडतो. पण अचानक २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काय पो चे' नावाच्या एका चित्रपटात हा मुलगा पुन्हा आपल्या नजरेस पडतो आणि पुन्हा आपल्या कलेने सर्वांच्या मनात आपलं स्थान प्रस्थापित करतो. ह्या रोल साठी 'फिल्मफेअर अवॉर्ड बेस्ट मेल डेबूट' पुरस्कारासाठी त्याचं नामांकन होतं. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमान्स', 'डिटेक्टिव्ह ब्योंकेश बक्षी', 'पी के' ह्या काही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना आपण ह्या मुलाला पाहत आलो. आता हा इथेच थांबत नाही तर हा चक्क जगप्रसिद्ध क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ह्याच्या २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' नावाच्या बायोपिकमध्ये धोनीची भूमिका साकारून सर्वांना भांभावून सोडतो. ह्यासाठी त्याला 'फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टर' ह्या पुरस्कारासाठी साठी नामांकन देखील मिळतं. खरंतर ह्या चित्रपटातील त्याच्या कलेने त्याने पुन्हा एकदा आपल्या कार्यकिर्दीत नाविन्य आणले. आणि हेच करिअर समोर ठेवून त्याने २०१९ मध्ये 'केदारनाथ' आणि २०२० मध्ये 'छिछोरे' नावाच्या दोन चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. ह्याशिवाय पुढे १२ बायोपिक साठी ह्याचं नाव विचारात घेण्यात आलं होतं ज्यात रवींद्रनाथ टागोर, चाणक्य, ए पी जे अब्दुल कलाम ह्यांसारख्या थोर व्यक्तींच्या बायोपिक होत्या. 'काय पो चे', 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'छिछोरे' ह्यांसारख्या चित्रपटांतून ह्या मुलाने नेहमीच आपल्या मनात त्याचं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं. ह्याचबरोबर ह्या मुलाने Sushant4Education नावाची तरुण मुलांना मदत करणारी एक संस्था देखील चालवत होता. आपण नेहमीच आपण ह्या मुलाचं कौतुक करत आलो पण आज अचानक ह्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी आपल्याला मिळते. वय वर्ष फक्त ३४. त्याने नुकतीच आपल्या करिअरला सुरवात केली होती. नेमकं असं काय घडलं की त्याला इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं ते नाही माहीत पण ह्या ८० दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये आपल्या मानसिक तणावावर नियंत्रण ठेवणे हे खूप कठीण आहे.
आज समाजात असेही काही जण आहेत जे मानसिक तणाव कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी सुरू केलेलं हे काम खरंच वाखाणण्यासारखे आहे कारण आज ह्या स्टार तरुणावर जो काही प्रसंग आला आहे त्या प्रसंगातून आपल्या समाजात आज बरेच जण जात आहेत. ह्यांच्या चालू असलेल्या कार्यास आपण देखील सर्वांनी शक्य तितके सहकार्य करावे.
आपल्या सर्वांच्या मनात वसलेल्या त्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments
Post a Comment