टिळकांचा स्वदेशी विचार
टिळकांचा स्वदेशी विचार :
आधुनिक हिंदुस्थानच्या उभारणीसाठी ज्या महापुरुषांनी आपले आयुष्य पणाला लावले त्या महापुरुषांमध्ये प्रामुख्याने मुखी येणारे नाव म्हणजे लोकमान्य टिळक. आपल्या देशाला ह्या ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ४ सूत्रे आखली.
१. स्वराज्य
२. स्वदेशी
३. बहिष्कार
४. राष्ट्रीय शिक्षण
टिळकांची ''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" ही सिंहगर्जना आपल्याला सर्वांना माहीतच आहे. भारताला स्वराज्य बनवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. टिळकांच्या ह्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारला त्यांना अटक करावी लागली. परंतु थांबतील ते टिळक कसले. कारावास पूर्ण झाल्यावर परत त्यांनी 'पुनश्च हरिओम' नावाचा अग्रलेख लिहून आपला संघर्ष सुरू ठेवला.
मात्र स्वराज्यनिर्माण करत असता दुसरा महत्त्वाचा विचार टिळकांनी मांडला तो म्हणजे स्वदेशीचा. आपल्या देशाला जर स्वराज्य अर्थात स्वकीयांचं राज्य जर बनवायचं असेल तर आपल्याला स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म हे विसरून चालणार नाही हे टिळकांनी स्पष्ट केले. भारताला जर स्वराज्य बनवायचं तर विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे वारंवार टिळकांनी आपल्या लेखनशैलीतून व्यक्त केले आहे. आणि ह्याचसाठी त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा विचार नुसता मांडला नाही तर तो अंमलात देखील आणला. त्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज ह्या दोन शिक्षण संस्थांची उभारणी केली. ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वारंवार भारतीय तरुणांमध्ये स्वदेशी विचार पेरले.
काळाच्या दृष्टीने विचार केला तर टिळक हे कदाचित टाइम मशीनच असावेत. कारण त्यांनी मांडलेला स्वदेशी विचार आज आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आज देखील आपल्या देशातील माल हा प्रामुख्याने चीनमधूनच आयात केला जातो. कमाल आहे ना? डुप्लिकेट माल चायनाचा, टेक्नॉलॉजी चायनाची, दिवाळीचे दिवे चायनाचे, गणपतीचं डेकोरेशन चायनाचं आणि कोरोना? तो देखील चायनाचाच. आज आपल्या देशाला जर स्वावलंबी बनवायचं असेल तर स्वदेशी वस्तू आणि स्वदेशी सेवांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. टिळकांचे स्वदेशी विचार आज आपणच पुन्हा अंमलात आणण्याची गरज आहे.
भारत माता की जय!
Comments
Post a Comment