मॅगी
शनिवारचा दिवस होता. तसा विकेंडच होता. पण ऑफिस मधल्या कामाचं प्रेशरच इतकं.. कसल्या वीकएंड व्हाईब्स आणि कसलं काय. आधीच २ दिवस हिचं देवदर्शन देवदर्शन कधीपासून चालू होतं म्हणून घेतल्या २ दिवस सुट्ट्या. त्यामुळे बॉसने सुद्धा चांगलाच पिळून काढला होता शनिवारचा. घरी पोहोचायलाच रात्रीचे २ वाजले. त्यात आमच्या होम मिनिस्टर माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे माझी जेवणाची व्यवस्था सुद्धा नव्हती. बाहेर जावं तर दुकानं हॉटेलं सगळं बंद आणि घरी बसावं तर स्वीग्गी झोमॅटो सुद्धा बंद. भूक तर सडकून लागली होती. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी घरी बसून तर पर्याय नव्हता. मग काय काढली बाईक आणि निघालो बाहेर अन्नाच्या शोधात. एक २४ तास उघडं मेडिकल रस्त्यात लागलं. म्हटलं बघू इकडे तरी काय मिळतं का. मेडिकलच्या काउंटर वर उभाच होतो. मेडिकल वाल्या काकांना विचारणार तितक्यात नजर समोरच्या रॅककडे वळली. रॅक मध्ये असलेली मॅगी मला तिकडे दिसली. मॅगी पाहताच आनंद होऊन डोळ्यांत पाणी आलं. आनंद खायला मिळालं काहीतरी याचा होताच पण आनंदाश्रू मात्र मॅगी सोबत आलेल्या त्या माझ्या भावाच्या आठवणीने आले. लगेच मी मॅगी उचलली बिल पे केलं आणि बाईक वर स्वार होऊन घरी जाण्यास निघालो. तो रात्रीचा शांत रास्ता आणि बाईक वरून येत असताना भावाच्या आठवणीने संचारलेलं मन यांचा ताळमेळ चांगलाच रमत होता. दृष्टीस पडलेली ती मॅगी ची पुडीने मला माझ्या बालपणात परत नेऊन सोडलं होतं. रस्त्यावरून जाता जाता अचानक गाडीच्या चाकाने वळण कधी घेतलं माझं मलाच कळलं नाही. ती चाकं त्याच्या घराची वाट गाठू पाहत होती. बंधुराज सुद्धा वहिनींसोबत आनंदाने संसारात रमले होते. आमचं बालपण आठवता आठवता माझी बाईक त्याच्या घरखाली जाऊन थबकली. मी खालून हलकेच त्याच्या फ्लॅट च्या बालकनीवर नजर टाकली. लाईट बंद होते. अर्थातच साधे सरळ आमचे बंधुराज आरामात झोप काढत असतील हे ताडायला मला वेळ लागला नाही. पण मोठा भाऊ जितका साधा तितकाच लहान भाऊ हरामी म्हणतात ते काही चुकीचं नाही. मी लगेच खिशातून फोन काढून त्याला फोन केला. माझ्या घरी तर कोणी नव्हतं त्यामुळे मला आज अडवणार असं कोणी नव्हतं. पण आमच्या वाहिनीसाहेब म्हणजे एकदम कडक. त्यांनी मात्र आमच्या बंधुराजला चांगलेच ताब्यात ठेवले होते. मध्यरात्री अचानक छोट्याचा आलेला फोन बघून तो घाबरून गेला. पण मला चांगलंच माहीत होतं ना की मी जर याला मॅगी खायला गुपचूप घरी ये म्हणून जर बोलावलं तर हा कसला येतोय वहिनीला घाबरून. म्हणून मुद्दाम फोनवर सांगितलं की माझा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय लगेच ये मी खालीच थांबलोय आणि मुद्दाम चिंताग्रस्त असल्याची अकटिंग सुरू केली. जरी वहिनीच्या ताब्यात असला तरी मला माहित होतं की छोट्याचा प्रॉब्लेम झालाय आणि भाऊ नाय आला हे अशक्यच. तो लगेच उठून हळूच वहिनीची नजर चुकवून खाली आला. मी म्हटलं चल लगेच आत्ता सांगायला वेळ नाही आणि जी बाईक बाहेर काढली ती थेट माझ्या घराखाली लावली. घरी गेल्यावर गोंधळलेल्या आमच्या बंधुराजांनी विचारल्यानंतर मी हळूच त्याला पिशवीतून आणलेली मॅगी बाहेर काढून दाखवली. नेहमीप्रमाणेच छोट्याने खेळलेला गेम त्याच्या लक्षात आला. अर्थातच साधी सरळ मूर्ती हे पाहून राग येणार यात नवल ते काय. नंतर थोडा वेळ त्याचा राग आणि माझं त्या रागाला शांत करण्यासाठी एकेक अस्त्र सोडून त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे चालू असलेले प्रयत्न याची जुगलबंदी चालूच होती. तितक्यात त्याची कॉलेजची काही मला माहित असलेली लफडी आणि त्यावरून त्याला करण्यात आलेलं ब्लॅकमेलिंग हा पैंत्रा मात्र माझा सुकसेसफुल ठरला. नन्तर गप्पा गोष्टी रमत रमत मी किचन कडे वळलो. त्याने विचारलं कुठे चाललास मॅगी बनवायला का? ती तुझ्या हातची पाणचट मॅगी खायला आणलं का एवढा खटाटोप करून. बस गप्प असं म्हणत त्याने माझ्या हातातली मॅगी घेतली आणि किचन कडे वळला. आता बस्स अंगावर शहारे आणि मनात येणाऱ्या जुन्या आठवणी थांबायचं नावच घेत नव्हते. लगेच २ मिनिटात मॅगी बनून तयार होती. मॅगी चं पातेलं आणि दोन चमचे हे आमचं लहानपणापासूनच कॉम्बिनेशन होतं तेच त्याने आजही ठेवलं. पहिला घास खाताच आमच्या दोघांच्याही डोळ्यात अश्रुधारा वाहून आल्या. कारण या रोजच्या डेली रुटीन आणि धगधगत्या जीवनात आम्ही गमावलेलं बालपण त्या रात्री वसंत ऋतू मध्ये पडणाऱ्या पावसामुळे झाडाला फुटलेल्या पालवीप्रमाणे पुन्हा एकदा बहरून आलं होतं. आम्हाला लहानपनीचे ते सर्व क्षण आठवत होते. ते लहानपणीचं आई नसल्यावर एकमेकांशी होणारं भांडण, मस्ती, मारामारी, चिडवचिडवी, प्रेम आणि सगळ्यात शेवटी भूक लागल्यावर बनवलेली मॅगी.
Comments
Post a Comment